पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील एक धक्कादायक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. भर रस्त्यात थार गाडीतून उतरून एका तरुणाने हातात कोयता घेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती फॅन्सी नंबर असलेल्या थार गाडीतून आली होती. गाडीतून उतरल्यावर त्याने हातात कोयता घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

व्हिडिओ व्हायरल होताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून कोयता आणि थार गाडी जप्त करण्यात आली आहे. तसेच आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.




















Join Our Whatsapp Group