पिंपरी (Pclive7.com):- पुणे-मुंबई रोडवरील काळभोरनगर परिसरातील जय टॉवर इमारतीच्या बेसमेंटमधील दुकानांमध्ये गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात पाणी शिरत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. काल (दि.२२) संध्याकाळी झालेल्या तुफानी पावसामुळे पुन्हा एकदा सर्व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मुख्य रस्त्यावरील पावसाचे पाणी तसेच काळभोरनगर नाल्याचे पाणी थेट इमारतीच्या बेसमेंटमध्ये घुसत असल्याने दुकानदारांना दरवर्षी आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू झाला की दुकानांमध्ये पाणी साचण्याची समस्या निर्माण होते, त्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे.

स्थानिक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेतली जात नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने पावसाचे पाणी तुंबते आणि ते थेट दुकानांमध्ये शिरते, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

जय टॉवरमधील व्यापाऱ्यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. नाल्यांची योग्य साफसफाई, पाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून भविष्यात व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येईल, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group