पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील नव्याने सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपुलावर अवघ्या एका दिवसातच भीषण अपघात घडल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आज (दि.२३) सकाळी भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकावर आदळून पुलावरच पलटी झाली.

या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून चालक जखमी झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर काही काळ पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, या उड्डाणपुलाच्या उंची आणि तीव्र उतारावरून आधीपासूनच राजकीय वाद रंगले होते. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि स्थानिक भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये पुलाच्या रचनेवरून आरोप-प्रत्यारोप झाले होते. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने कोणताही औपचारिक उद्घाटन सोहळा न करता कालपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.

मात्र, सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झालेल्या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुलाच्या रचनेत त्रुटी आहेत का, तीव्र उतारामुळे वाहनचालकांना धोका निर्माण होतोय का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




















Join Our Whatsapp Group