विनोद नढे यांच्या पुढाकाराने काळेवाडीच्या विकासाला गती
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील विकासाच्या दृष्टीने उपेक्षित राहिलेल्या काळेवाडी परिसराचा येत्या दोन वर्षांत सर्वांगीण कायापालट करण्याचा निर्धार आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला. चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

प्रभाग क्रमांक २२ चे नगरसेवक विनोद नढे यांच्या पुढाकारातून आयोजित या बैठकीत काळेवाडी परिसरातील विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकास आराखडा, रखडलेली आरक्षणे, रस्ते, नाले, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्याने, क्रीडांगणे आणि रुग्णालय यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत नियोजन करण्यात आले.

नगरसेवक विनोद नढे यांनी सांगितले की, महापालिकेच्या धोरणांमुळे काळेवाडी परिसर अनेक वर्षे विकासापासून वंचित राहिला. मात्र आता आमदार शंकर जगताप यांनी स्वतः पुढाकार घेत अधिकाऱ्यांना नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

“काळेवाडीचा विकास करताना नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यावर विशेष भर दिला जाणार आहे,” असेही विनोद नढे यांनी स्पष्ट केले. या बैठकीला महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. काळेवाडी परिसरातील प्रलंबित प्रश्न सोडवून विकासकामांना गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




















Join Our Whatsapp Group