आळंदी (Pclive7.com):- संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातील दानपेटीतून सेवेकऱ्यानेच रोकड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विशाल बाळू वारूळे या सेवेकऱ्यावर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२, १३ आणि १६ मे २०२६ रोजी सायंकाळच्या वेळी दानपेटीतील रक्कम कॅशियरकडे जमा करण्याची जबाबदारी संबंधित सेवेकऱ्यावर होती. दानपेटीतील पैसे बकेटमध्ये भरत असताना आरोपीने संधी साधत नजर चुकवून रोकड स्वतःच्या पिशवीत टाकल्याचे समोर आले आहे. तीन दिवसांत एकूण १५ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सीसीटीव्ही फुटेज आणि अंतर्गत चौकशीतून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संस्थान प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनेनंतर भाविकांमध्ये संतापाचे वातावरण असून, मंदिरातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, समाधी मंदिर परिसरात यापूर्वीही पैसे चोरीच्या घटना घडल्याची चर्चा असून, प्रशासनाने कठोर पावले उचलली नसल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. दानपेट्यांची मोजणी प्रक्रिया, सीसीटीव्ही देखरेख आणि कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण यामध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोपही केला जात आहे.

या प्रकरणामुळे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आळंदी पोलिस पुढील तपास करत आहेत.




















Join Our Whatsapp Group