आळंदी (Pclive7.com):- संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीतील रकमेवरच सेवेकऱ्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशाल वारुळे असे संबंधित सेवेकऱ्याचे नाव असून, त्याच्या घरातून तब्बल पावणे चार लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही रोकड १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटांनी भरलेल्या पिशव्यांमध्ये आढळून आली.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल वारुळे हा गेल्या तीन महिन्यांपासून मंदिरातील दानपेटीतील रक्कम जमा करणे व मोजणीचे काम करत होता. याच काळात त्याने हातचलाखी करत दानपेटीतील काही रक्कम बाजूला काढून स्वतंत्र पिशव्यांमध्ये साठवण्यास सुरुवात केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, ज्या दिवशी तो रोकड भरलेली पिशवी घरी घेऊन जायचा, त्या दिवशी मंदिरातील हार घेऊन जात असल्याचे सांगायचा. पिशवीच्या वरच्या भागात हार ठेवून खाली रोकड लपवली जात होती. त्यामुळे कोणालाही संशय येत नव्हता. घरी गेल्यानंतर तो ही रोकड मोजून पिशवीसह बेडमध्ये लपवून ठेवत असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणामुळे मंदिर प्रशासन आणि सेवेकऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भक्तांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




















Join Our Whatsapp Group