पिंपरी (Pclive7.com):- पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा विधान परिषद इच्छुक उमेदवार योगेश बहल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

“अजितदादा हयात असते तर पुणे विधान परिषदेवर हक्क दाखवत भाजपने काहीही वल्गना केल्या नसत्या,” असे वक्तव्य योगेश बहल यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राजकारणात तुलनेने नवख्या असल्याने भाजप त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे का? तसेच भाजपकडून त्यांची कोंडी केली जात आहे का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना बहल यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधत नव्या राजकीय चर्चांना हवा दिली.

मात्र, “सुनेत्रा वहिनी खंबीर आहेत आणि पुणे विधान परिषदेची आमच्या हक्काची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळवून देतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण होणार नसल्याचा दावा दोन्ही बाजूंनी केला जात असला, तरी योगेश बहल यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले असून आगामी काळात या मुद्द्यावरून आणखी राजकीय घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




















Join Our Whatsapp Group