पिंपरी (Pclive7.com) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे १०५ शाळांमध्ये ६० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य, जीवन व अपघाती विमा योजना तातडीने लागू करावी, अशी मागणी नगरसेविका श्रुती राम वाकडकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.

महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कामगार व कष्टकरी कुटुंबांतील आहेत. गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या अपघात, गंभीर दुखापत, अन्न विषबाधा तसेच दुर्दैवी मृत्यूच्या घटना घडल्या असून, अशा प्रसंगी संबंधित कुटुंबांवर मोठा आर्थिक व मानसिक ताण निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना तात्काळ उपचार व आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी महापालिका स्तरावर विमा योजना राबविणे अत्यावश्यक असल्याचे श्रृती वाकडकर यांनी म्हटले आहे. निवेदनात करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
# महापालिका शाळांतील सर्व विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, जीवन व अपघाती विमा योजना लागू करावी.
# अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना महापालिका रुग्णालयांमध्ये मोफत उपचार उपलब्ध करून द्यावेत.
# गरजेनुसार मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करावी.
# अपघात अथवा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाला आर्थिक सहाय्य द्यावे.
# योजनेसाठी महापालिका निधी, CSR निधी अथवा शासन योजनांमधून आर्थिक तरतूद करावी.

सुमारे २ कोटी ४० लाख रुपयांच्या वार्षिक खर्चातून ६० हजार विद्यार्थ्यांना विमा संरक्षण मिळू शकते. अल्प खर्चात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे जीवन सुरक्षित करणारी ही योजना सामाजिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त व जनकल्याणकारी ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी नगरसेविका श्रुती वाकडकर यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group