पिंपरी (Pclive7.com):- वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी, आयटी कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना खराडी आयटी पार्क आणि स्वारगेट येथे जाण्यासाठी थेट PMPML बससेवा उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी PMPML प्रशासनाकडे नवीन बसमार्ग सुरू करण्याची मागणी केली आहे.

याबाबत नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी PMPML चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आहाड यांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये ऑक्सिजन पार्क, पुनावळे ते EON आयटी पार्क, खराडी तसेच मुकाई चौक ते स्वारगेट या मार्गांवर नवीन बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सध्या या परिसरातून खराडी आयटी पार्क, स्वारगेट तसेच शहरातील इतर प्रमुख ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना थेट बससेवा नसल्याने अनेक बस बदलून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय, आर्थिक खर्च आणि वाहतूक कोंडी वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले असून पर्यावरण संवर्धन आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर होणे आवश्यक आहे. त्यानुसार वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील नागरिकांना सुलभ व थेट PMPML बससेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.”

ते पुढे म्हणाले की, “या बससेवेमुळे विद्यार्थी, महिला प्रवासी, नोकरदार वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. तसेच खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल.” शहरातील वाढती लोकसंख्या आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन PMPML प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर नवीन बससेवा सुरू करावी, अशी आग्रही मागणीही कुणाल वाव्हळकर यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group