अन्यथा ६ जूनपासून आमरण उपोषण; नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचा इशारा
पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १६ मधील गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, राऊतनगर, रावेत आणि विकासनगर परिसरातील अनेक रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना दररोज वाहतूक करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यांचे डांबरीकरण तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, संबंधित भागातील रस्त्यांच्या डांबरीकरणाबाबत यापूर्वी अनेकदा पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यांवरील खड्डे, खराब झालेला पृष्ठभाग आणि वाढती वाहतूक यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये असून, प्रलंबित डांबरीकरणाची सर्व कामे तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांना त्वरित सुरुवात न झाल्यास ६ जूनपासून आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनातून नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्या या भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांच्या रस्त्यांच्या प्रश्नाला पुन्हा एकदा वाचा फुटली असून, आता महापालिका प्रशासन यावर किती लवकर निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group