पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी येथील विषारी दारू प्रकरणात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी तसेच चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे. तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये दापोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, तपास पथकाचे (गुन्हे शोध) प्रमुख फौजदार राजू भास्कर आणि कर्मचारी जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव आणि विशाल काळे यांचा समावेश आहे.

फुगेवाडी परिसरात विषारी दारू सेवनामुळे मृत्यूंची मालिका सुरू असताना सुरुवातीला विविध कारणे पुढे करून प्रकरणाचे गांभीर्य कमी दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. मृत्यूंची संख्या वाढत असतानाही अवैध दारू विक्री आणि हातभट्टी व्यवसायाविरोधात प्रभावी कारवाई करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याची टीका नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित भागातील अवैध दारू व्यवसायाबाबत पूर्वीपासून माहिती असूनही वेळेवर कारवाई का करण्यात आली नाही, याबाबतही चर्चा सुरू आहे. अनेकांच्या मते, ही कारवाई आवश्यक असली तरी ती उशिरा झाल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.

दरम्यान, विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपींना कठोर शिक्षा देण्याबरोबरच शहरातील अवैध दारू विक्री, हातभट्टी अड्डे आणि संबंधित साखळीवर व्यापक मोहीम राबविण्याची मागणी जोर धरत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बेकायदेशीर धंद्यांवर कायमस्वरूपी लगाम लावण्यासाठी कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




















Join Our Whatsapp Group