निगडी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १३, यमुनानगर व सेक्टर क्रमांक २२ परिसरातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमात तब्बल १२० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने पालकांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केले होते.

कार्यक्रमात मॉर्डन शाळेचे ज्येष्ठ मुख्याध्यापक शरद इनामदार यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी भवितव्यासाठी आवश्यक असलेल्या अभ्यासपद्धती, शिस्त आणि करिअर नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. माजी नगरसेविका अश्विनी चिखले-मराठे यांनी मोबाईलचा योग्य वापर, त्याचे फायदे-तोटे आणि डिजिटल युगातील आव्हाने याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे भान, सामाजिक जबाबदारी आणि सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण पाटील, माणिकराव माने, समाधान नागरे, गजानन ढमाले, सिरीयल साठे, दत्तात्रय भुजबळ, अंकुश डोंगरे, सुनील राणे, मधुकर सपकाळ, बाळू सकट, नायडू महाराज, दत्तात्रय लांडगे, मारुती पवार तसेच मनसेचे उपशहराध्यक्ष राजू सावळे, मनोज लांडगे, रोहित काळभोर, स्वप्निल महागरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना त्यांना भविष्यातही अशीच यशाची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी सुनील राणे यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक व सर्व मान्यवरांचे आभार मानत मनोगत व्यक्त केले. “गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाजाने भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणूक,” असा संदेश देणारा हा सत्कार सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.




















Join Our Whatsapp Group