५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्याचे महापालिकेचे आवाहन
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत उद्या रविवार, दि. २८ जून रोजी संपूर्ण शहरात ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील ० ते ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात येणार असून, पालकांनी आपल्या बालकांना जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत करण्यात आले आहे.

शहरात सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ११२३ पोलिओ लसीकरण केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओचा डोस देणार आहेत.

ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४५५२ लसीकरण कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला आरोग्य समिती सदस्य, रोटरी क्लबचे स्वयंसेवक आणि इतर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
शहरातील सर्व महापालिका दवाखाने, रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये, अंगणवाडी केंद्रे, बस स्थानके, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके तसेच स्थलांतरित नागरिकांच्या वस्त्यांमध्ये पोलिओ लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

० ते ५ वर्षांखालील बालकांना पोलिओचे दोन थेंब देणे का आवश्यक आहे?
– पोलिओसारख्या गंभीर आजारापासून प्रभावी संरक्षण मिळते.
– पक्षाघाताचा धोका कमी होण्यास मदत होते.
– बालकाची रोगप्रतिकारक क्षमता अधिक बळकट होते.
– निरोगी, सुरक्षित आणि आनंदी बालपणासाठी संरक्षण मिळते.
– भारताचा पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्यास हातभार लागतो.
– यापूर्वी पोलिओचे सर्व डोस घेतले असले, तरी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेतील डोस घेणे आवश्यक असते.
– नवजात तसेच किरकोळ आजारी असलेल्या बालकांनाही पोलिओची लस सुरक्षितपणे देता येते.
“पोलिओमुक्त भारताचे यश कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाने ही आपली सामाजिक जबाबदारी समजून मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. रविवार, दि. २८ जून रोजी आपल्या ० ते ५ वर्षांखालील बालकाला जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
“राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या घरातील तसेच परिसरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी,”
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.




















Join Our Whatsapp Group