पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, टाळगाव चिखली येथील फेज-२ अंतर्गत सुरू असलेली सर्व प्रलंबित व अपूर्ण विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, फेज-२ मधील अनेक आवश्यक कामे अद्याप अपूर्ण असल्याने शाळेच्या दैनंदिन कामकाजावर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर आणि उपलब्ध सुविधांच्या प्रभावी वापरावर परिणाम होत आहे. शाळा प्रशासनाने वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित कामांची पूर्तता झालेली नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
प्रलंबित कामांमध्ये इमारतीचे इलेव्हेशन, सोलर प्रणाली, लिफ्ट कार्यान्वित करणे, सीसीटीव्ही व्यवस्था, बेसमेंटमधील उर्वरित कामे, अग्निशमन यंत्रणा, केबिनची कामे, खेळाचे मैदान, कंपाऊंड वॉल, गणित व भूगोल प्रयोगशाळा, डान्स रूम, इलेक्ट्रिकल कामे, नोटीस बोर्ड, सेफ्टी डोअर तसेच सभागृहाची अपूर्ण कामे यांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने ही सर्व कामे अत्यावश्यक असल्याने संबंधित विभागाला आवश्यक निधी, मनुष्यबळ आणि साहित्य उपलब्ध करून देत फेज-२ मधील सर्व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे. तसेच या विषयाला प्राधान्य देऊन महापालिका प्रशासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

“जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ हे भविष्यातील गुणवंत विद्यार्थी घडविणारे महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. देशातील पहिले संतपीठ पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आले. त्यामध्ये अडीच हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अध्यात्म, वारकरी सांप्रदाय आणि आधुनिक शिक्षणाचा संगम म्हणजे संतपीठ आहे. या संकुलात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. फेज-२ मधील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रभावी पाठपुरावा करून ती निश्चित पूर्ण करणार आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.




















Join Our Whatsapp Group