पिंपरी (Pclive7.com):- किवळे ते गहुंजे जोडणाऱ्या मामुर्डी येथील सर्व्हिस रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

काल रात्री एका दाम्पत्याची दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात आदळल्याने ते आपल्या लहान बाळासह रस्त्यावर कोसळले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संबंधित कुटुंबाला किरकोळ दुखापती झाल्याची माहिती मिळाली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या सर्व्हिस रोडवर यापूर्वीही पाच ते सहा गंभीर अपघात घडले असून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली आहे.

“निवडणुका आल्या की नगरसेवकांचे चेहरे बदलतात, मात्र नागरिकांच्या समस्या तशाच राहतात,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही आणि अपघातांचा धोका अधिक वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group