पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘आर्म ड्राईव्ह’ मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट-२ ने मोठी कारवाई करत दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून ३ पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आर्यन प्रकाश जाधव (वय २० वर्षे, रा.क्षत्रियनगर बावधन आणि ओमकार सचिन मोरे (वय २३ वर्षे, रा. शास्त्रीनगर कोथरुड पुणे) अशी अटक केलेले आरोपीची नावे आहेत.

चांदणी चौक, बावधन परिसरात काही व्यक्ती बेकायदेशीर हत्यारांसह येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई रवी पवार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने बावधन परिसरात सापळा रचला. यावेळी आर्यन प्रकाश जाधव आणि ओमकार सचिन मोरे या दोन सराईत गुन्हेगारांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या झडतीदरम्यान ३ पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध आर्म ॲक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी ओमकार मोरे याच्याविरुद्ध यापूर्वी चंदननगर, सिंहगड रोड आणि कोथरूड पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी सुरू असलेल्या आर्म ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-२ करत आहे.

सदरची कामगिरी गुन्हे शाखा, युनिट-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक पोउपनि मयुरेश साळुंखे, श्रेणी पोउपनि दिपक खरात, प्रविण दळे, नितीन ढोरजे, पोलीस हवालदार तुषार शेटे, विक्रम कुदळ, कुणाल शिंदे, मोहम्मद गौस नदाफ, भाऊसाहेब राठोड, अली शेख, दिपक शिरसाट, कृष्णा शितोळे, पोलीस शिपाई प्रशांत सैद, रवि पवार, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, धनंजय जाधव यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group