पिंपरी (Pclive7.com):- कॅन्टोन्मेंट येथील विद्युत दाहिनीमध्ये होत असलेल्या गैरव्यवस्थेबाबत नगरसेविका रेश्मा बापुजी कातळे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत दाहिनी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

प्रभागातील नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होत असलेल्या तक्रारींची दखल घेत नगरसेविका रेश्मा कातळे यांनी हे निवेदन दिले आले. निवेदनात विद्युत दाहिनीमध्ये आवश्यक कर्मचारी उपलब्ध नसणे, परिसराची नियमित स्वच्छता न होणे तसेच अनेकदा विद्युत दाहिनी बंद असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

विद्युत दाहिनीची तातडीने पाहणी करून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, नियमित स्वच्छतेची प्रभावी व्यवस्था करावी तसेच विद्युत दाहिनी अखंडितपणे सुरू राहील यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेविका कातळे यांनी केली आहे. याशिवाय, संबंधित ठेकेदाराला करारातील अटींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात यावेत आणि निष्काळजीपणा आढळल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नागरिकांना अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील प्रसंगी सन्मानपूर्वक व विनाअडथळा सेवा मिळणे आवश्यक असून, प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नगरसेविका रेश्मा बापुजी कातळे यांनी व्यक्त केली.




















Join Our Whatsapp Group