पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील सुमारे १,२८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होऊन १५ दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही शालेय पाठ्यपुस्तके उपलब्ध झालेली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना तात्काळ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करावा तसेच या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सन २०१३ पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आकांक्षा फाउंडेशन यांच्या माध्यमातून कै. अनुसया नामदेव वाघेरे इंग्लिश मिडियम शाळा, कै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्लिश मिडियम शाळा आणि पी.सी.एम.सी. बोपखेल इंग्लिश मिडियम शाळा या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना पूर्णतः मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. या शाळांनी सातत्याने उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करत इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के राखला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमही राबविले जात आहेत.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील दोन वर्षांपासून शाळांकडून शालेय पाठ्यपुस्तकांची मागणी वेळेत करूनही संबंधित विभागाकडून वेळेवर पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आलेला नाही. यावर्षीही शाळा सुरू होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला असतानाही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. त्यामुळे नियमित अध्यापनावर परिणाम होत असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
याबाबत नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात संबंधित विभागाला तातडीने पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावेत, तसेच वेळेत मागणी प्राप्त होऊनही पाठ्यपुस्तकांचा पुरवठा न करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय व शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
तसेच, भविष्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा पुन्हा होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सांगितले की, “गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हा या शाळांचा मूलभूत उद्देश आहे. मात्र, वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध न होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दोषींवर कठोर कारवाई करावी. अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.




















Join Our Whatsapp Group