पिंपरी (Pclive7.com):- पवना धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन तो सुमारे ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला असतानाही पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्यावर लागू असलेली १५ टक्के कपात अद्याप कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांकडे पाणीपुरवठ्यावरील निर्बंध तात्काळ हटवून पूर्ववत पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली आली आहे.

काही दिवसांपूर्वी पवना धरणातील पाणीसाठा केवळ १५ टक्क्यांवर आल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात केली होती. तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेतही कपात करून पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या निर्णयाला सहकार्य करत पाणी बचतीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून तो आता ७० टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे शहरावर ओढावलेली पाणीटंचाईची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी झाली असल्याचे चित्र आहे.

असे असतानाही शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा, कमी कालावधीचा पुरवठा आणि अनियमित वितरण अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावरील १५ टक्के कपात रद्द करून पूर्वीप्रमाणे नियमित वेळेनुसार आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने पवना धरणातील सध्याच्या पाणीस्थितीचा आढावा घेऊन शहरातील पाणीपुरवठ्यावरील निर्बंध तात्काळ हटवावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group