पिंपरी (Pclive7.com):- गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपळे सौदागर परिसरासह शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, प्रशासन आणि महावितरणच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे पिंपळे सौदागरमधील बहुतांश भागांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून उर्वरित काही भागांमध्ये युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हेंटेज सोसायटी, पीस व्हॅली सोसायटी, साई श्री सोसायटी आणि शिवराज नगर परिसरात तांत्रिक बिघाड तसेच पाणी साचल्यामुळे वीजपुरवठा अद्याप खंडित आहे. या भागांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला असून, वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले आहे. पावसाचा जोर आणि सुरक्षेच्या कारणास्तव दुरुस्तीच्या कामाला काहीसा वेळ लागत असला तरी वीजपुरवठा लवकरच सुरळीत होईल, असा विश्वास शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील शत्रुघ्न काटे यांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तत्पर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.




















Join Our Whatsapp Group