पिंपरी (Pclive7.com):- पुणे-लोणावळा प्रवासादरम्यान पर्यटकांना अडवून त्यांना अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महामार्ग पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचारी आणि तीन वॉर्डनवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य महामार्ग पुणे विभागाचे दोन पोलीस शिपाई, एक पोलीस नाईक यांच्यासह तीन वॉर्डन अशा सहा जणांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले जाणार असल्याचे राज्य महामार्गचे पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले. याप्रकरणी पुण्यातील विमाननगर येथील २८ वर्षीय तरुणाने कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी फिर्यादी हे त्यांचे मित्र, मित्राचे कुटूंबिय यांच्यासह मोटारीने लोणावळ्याकडे फिरायला जात होते. रात्री साडेआठच्या सुमारास कामशेत जवळील ताजे गाव येथे अंबर दिवा असलेल्या मोटारीमधील पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या सहा पोलिसांनी त्यांची मोटार तपासणीच्या नावाखाली अडवली. ‘आम्ही महामार्ग वाहतूक पोलीस आहोत. तुमच्या मोटारीतील गांजा, अंमली पदार्थ काढून द्या, नाही तर आम्ही तपासणी केल्यावर तुमच्यावर कारवाई करावी लागेल’, अशी धमकी दिली.

फिर्यादीच्या मित्राकडे सिगारेटचे पाकीट सापडले. या पाकिटावरून पोलीस कारवाई नको असेल तर पाच लाख रुपयांची मागणी केली. पोलिसांनी या सर्वांना पैसे देण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील एका एटीएम केंद्रावर नेले. यावेळी फिर्यादीने पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या सहकार्यांना तिथेच सोडून पोलिसांनी तेथून त्यांच्या मोटारीतून पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कामशेत पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार पुढील तपास करीत आहेत.




















Join Our Whatsapp Group