पिंपरी (Pclive7.com):- मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज (दि.१०) पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या आंदोलनात शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसेविका सुलभा उबाळे, ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे तसेच नगरसेवक निलेश तरस, राजेंद्र तरस, बापू कातळे यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व नगरसेवक सहभागी झाले होते.

मोशी दुर्घटनेला ४८ तासांहून अधिक कालावधी उलटूनही बचावकार्य सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, संबंधितांना निलंबित करून निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत दुर्घटनेतील मृत आणि जखमी नागरिकांना न्याय मिळावा, अशी भूमिका मांडली. दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.




















Join Our Whatsapp Group