पिंपरी (Pclive7.com):- मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी तीव्र दुःख व्यक्त करत या घटनेस जबाबदार असलेल्या सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी म्हटले आहे की, मोशी कचरा डेपोतील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी आहे. या घटनेत बाधित झालेल्या नागरिकांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, पूर्वनियोजित कामानिमित्त ते ७ जुलैपासून राज्याबाहेर असल्याने दुर्घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. याबाबत त्यांनी नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली असून, शहराबाहेर असतानाही मदतकार्य आणि परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे नमूद केले आहे.
सध्या घटनास्थळी एनडीआरएफ, अग्निशमन दल, लष्कर आणि इतर यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घडीला प्रत्येकाने राजकारण बाजूला ठेवून बचाव यंत्रणांना सहकार्य करावे आणि बाधित कुटुंबांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या दुर्घटनेची केवळ औपचारिक चौकशी न करता, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व संबंधित यंत्रणांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. शहरात परतल्यानंतर संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा घेणार असून दोषींना शिक्षा मिळवून देण्यासाठी आणि पीडित कुटुंबांना न्याय व योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मोशी कचरा डेपोच्या व्यवस्थापन व सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण पुनर्रचना करण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. पीडित कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला.




















Join Our Whatsapp Group