पिंपरी (Pclive7.com):- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने रंगेहात पकडले. आरोपी महिलांकडून सुमारे १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार पालखी सोहळ्यात भाविकांच्या सुरक्षेसाठी गुन्हे शाखा युनिट-३ चे विशेष पथक साध्या वेशात तैनात करण्यात आले होते. हे पथक आळंदी ते बोपखेल फाटा दरम्यान वारकऱ्यांमध्ये मिसळून गस्त घालत होते. यावेळी पालखी दिघी पोलीस स्टेशन हद्दीत आल्यानंतर एका महिला भाविकेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करण्याचा प्रयत्न दोन महिलांनी केला. पथकातील पोलिसांनी तत्काळ संशयित महिलांना पकडून चौकशी केली. नयना विष्णू काळे (वय २०, रा. संभाजीनगर) व तिच्या सोबत अल्पवयीन महिला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तपासादरम्यान आरोपींकडून हिसकावून चोरलेले १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. फिर्यादी सुनिता नारायणराव राऊत (वय ५०, रा. चऱ्होली फाटा) यांच्या तक्रारीवरून दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस अंमलदार सुरेखा बोरसे, बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, दिलीप राठोड, निखील फापाळे व स्वप्नील महाले यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group