पिंपरी (Pclive7.com):- मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री पुण्यात संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचाव आणि शोधकार्याबाबत महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. प्रशासनाकडून बचावकार्य आज रात्रीपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी आयुक्तांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली.

मोशी येथील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे 100 टन कचऱ्यावर त्वरित प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र व प्रभावी यंत्रणा उभारण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या.
मोशी कचरा डेपो परिसरातील परिस्थिती भविष्यात नियंत्रणात राहावी आणि अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या आढावा बैठकीस आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group