राज्यात जातपंचायतींच्या विरोधात कायदा करण्यात आला आहे. मात्र, कंजारभाट समाजाकडून सातत्याने जात पंचायती चालवत कुप्रथांना खतपाणी घातले जाते. कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीला समाजातील काही युवक-युवतींनी याआधी कडाडून विरोध केला होता. मात्र, समाजावर पंचायतीचा मोठा प्रभाव असल्याचे दिसून येते.
या घटनेतील वधू-वराचा विवाह नुकताच कोरेगाव पार्क येथे झाला. कंजारभाट समाजातील जातपंचायतीच्या नियमाप्रमाणे विवाहाच्या आधी व नंतर जातपंचायत भरविली जाते. विवाहानंतर वधू-वराला एका अज्ञात ठिकाणी घेऊन जातात. त्यांना मधुचंद्राच्या नावाखाली एका खोलीत बंद केले जाते. त्यानंतर ही जातपंचायती भरवली जाते. त्या जातपंचायतीमधील सदस्य वराला वधू शुद्ध आहे का? अशी विचारणा करते. त्यानंतर वर मधुचंद्राच्या आधी खाटेवर टाकलेले शुभ्र पांढरे कापड दाखवतो. त्यावर रक्ताचे डाग असल्यास वधू शुद्ध असल्याचा निर्णय जातपंचायत देते. जातपंचायतीच्या निर्णयाप्रमाणे वधू शुद्ध नसल्यास ते वधू पित्याला मोठा दंड आकारून विवाहाला मान्यता देतात. त्याला वराची व त्यांच्या नातेवाईकांची संमती असते. समंती नसल्यास वधूच्या कुटुंबीयांना वाळीत टाकण्यात येते. या जातपंचायतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणही जातपंचायतीला शरण येऊन अशा कुप्रथांना दुजोरा देत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी या कौमार्य चाचणी विरोधात कंजारभाट समाजातील काही सुशिक्षित तरुण-तरुणींनी समोर येत ही प्रथा बंद करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर याविरुद्ध मोहीम चालू केली आहे. # Stop The “V”Ritual या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये ७० ते ८० तरुण- तरुणी आहेत. सध्या व्हर्जिनिटी हा मुद्दा थांबवणे व कौमार्य चाचणी विरोधात एकत्र येण्याचा या ग्रुपचा उद्देश असल्याची माहिती या प्रथेविरुद्ध आवाज उठवणारे विवेक तमायचीकर यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group