पिंपरी (Pclive7.com) : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सुमारे ९७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरात अद्याप १५ टक्के पाणी कपात सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही पाणी कपात तात्काळ रद्द करून नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संदीप वाघेरे यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने किंवा अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे महिलांवर, ज्येष्ठ नागरिकांवर तसेच नोकरदार वर्गावर अतिरिक्त ताण निर्माण होत असून दैनंदिन कामकाज विस्कळीत होत आहे. घरगुती वापर, स्वच्छता, आरोग्य सेवा, शैक्षणिक संस्था, लघुउद्योग आणि व्यापारी आस्थापनांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे. अनेक नागरिकांना टँकरद्वारे पाणी खरेदी करण्याची वेळ येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पवना धरणात मुबलक पाणीसाठा असताना पाणी कपात कायम ठेवण्याचे कोणतेही औचित्य नसल्याचे सांगत शहरातील सर्व भागांमध्ये नियमित, पुरेशा दाबाने आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय, कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या भागांमध्ये तातडीने तांत्रिक उपाययोजना कराव्यात, पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक पारदर्शक करावे, गळती व पाण्याची नासाडी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नाची महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शहरावरील पाणी कपात रद्द करावी आणि नियमित पाणीपुरवठा सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही भूमिका नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मांडली आहे.




















Join Our Whatsapp Group