महापौर, आयुक्त व पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न; प्रशासकीय कार्यवाही तातडीने सुरू करण्याचा निर्णय
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (ई-आरटीएस) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे आणि सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या उपस्थितीत संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली.

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पिंपरी चिंचवड शहरासाठी ई-आरटीएस आणि हाय कॅपेसिटी मास ट्रान्झिट रूट (एचसीएमटीआर) प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या स्तरावर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भातील पुढील कार्यवाही, आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया, तांत्रिक नियोजन तसेच प्रकल्पाच्या कालबद्ध अंमलबजावणीबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीमध्ये ई-आरटीएस प्रकल्पाच्या प्रायोगिक टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक विभागीय समन्वय वाढविणे, तांत्रिक बाबींची पूर्तता करणे, विविध यंत्रणांशी समन्वय साधणे आणि नियोजित कालावधीत प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ई-आरटीएस ही अत्याधुनिक, पूर्णतः इलेक्ट्रिक आणि उच्च क्षमतेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असून, शहरातील मेट्रो, बीआरटी, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी प्रभावी जोडणी निर्माण करण्यास ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, प्रदूषणात घट होण्यास, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यास तसेच नागरिकांना सुरक्षित, जलद आणि आधुनिक प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून ई-आरटीएस प्रकल्पाला अपेक्षित गती देण्यासाठी महानगरपालिका सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही पार पाडण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.




















Join Our Whatsapp Group