– बाळासाहेब जवळकर –
पिंपरी (Pclive7.com):- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ म्हणजे, मराठी माणसाच्या दैनंदिन जगण्यातील आनंदाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. घराघरात, गावागावात, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या या अस्सल मराठमोळ्या कार्यक्रमाने, त्यातील ‘हास्यमंत्रा’ने गेली आठ वर्षे जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.

‘सोनी मराठी’ वाहिनीवर १९ ऑगस्ट २०१८ रोजी सुरू झालेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या हास्यमालिकेला बुधवारी, १९ ऑगस्टला आठ वर्षे पूर्ण झाली. पहिल्या भागापासून लक्षवेधी ठरलेली ही ‘कॉमेडीची फाईव्ह जी’ मालिका आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. कलाकारांच्या फळीत बदल, कित्येक व्यक्तिरेखा आल्या आणि गेल्या. सिरीज बदलत राहिल्या. प्रक्षेपणाचे वार आणि वेळा सतत बदलल्या, तरी काही फरक पडला नाही. हास्यजत्रेची लोकप्रियता कायम राहिली. ती तसूभरही कमी झाली नाही. हास्यजत्रेच्या स्पर्धेत इतर कोणीही टिकू शकले नाही.
पाहता-पाहता आठ वर्षे पूर्ण झाली. त्यानंतरही जत्रा अजून थांबलेली नाही. आतापर्यंतचा प्रवास कौतुकास्पद आहे, तो आत्मपरीक्षणाचाही असला पाहिजे. ‘कपिल शर्मा शो’चे जे झाले. ‘चला हवा येऊ द्या’ ची अवस्था काय झाली. तसे काही भविष्यात होऊ नये, त्यादृष्टीने सर्वांनी मिळून खबरदारी घेतली पाहिजे. काही उणीवा निश्चित आहेत, त्या दूर झाल्या पाहिजेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा केवळ हास्यनिर्मिती करणारा कार्यक्रम नाही. तर मराठी भाषेच्या बहुरंगीपणाचे दर्शन घडवणारा आहे. कौटुंबिक संघर्ष, सासू-सुनांची कारस्थाने, अतिनाट्यमयता, कृत्रिम विनोदांनी भरलेल्या सध्याच्या मनोरंजन विश्वात ‘हास्यजत्रे’ने वेगळा मार्ग स्वीकारला. प्रेक्षकांना गृहीत न धरता, त्यांची अभिरुची समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी काहीतरी नवे, वेगळे देण्याची धडपड ठेवली. विविधांगी विषय हाताळले. म्हणूनच हास्यजत्रेचा लोकप्रियतेचा पाया भक्कम आहे.

निखळ मनोरंजनाला दर्जेदार लेखन, उत्तम अभिनय, अचूक टायमिंग, मराठी मातीशी जोडलेली संवेदनशीलता यांची जोड मिळाली, तर त्यातून किती चांगली कलाकृती निर्माण होऊ शकते आणि तिला दणदणीत यश मिळू शकते, याचे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हे उत्तम उदाहरण आहे. ‘हास्यजत्रे’च्या विनोदाची व्याप्ती मोठी आहे. दैनंदिन आयुष्यातील साधे प्रसंग, नातेसंबंधांमधील गंमती-जमती, सामाजिक विसंगती, बदलती जीवनशैली, नव्या पिढीचे प्रश्न, माणसाच्या सवयी, बोलीभाषा, सामाजिक वास्तव अशा असंख्य विषयांना हास्यजत्रेत विनोदाच्या माध्यमातून स्पर्श केला जातो. दर्जेदार विनोद, फसलेले विनोद, विसंगतीतून निर्माण झालेले विनोद, फसलेले विनोद, अतिशयोक्तीपूर्ण विनोद, समाजातील वास्तव, सद्यस्थितीवरच्या एखाद्या विषयावरचे सूचक भाष्य…अशा कितीतरी विषयांवर हलक्या-फुलक्या पध्दतीने मात्र अभ्यासपूर्ण मांडणी केली जाते.
हास्यजत्रेच्या प्रेक्षकांना टीव्हीच्या पडद्यावर दाखवले जाणारे जग अनोळखी वाटत नाही. त्यात स्वतःचेच जग दिसते. घरातील व्यक्ती, मित्र, शेजारी, नातेवाईक, कार्यालयातील सहकारी किंवा स्वतःचीच एखादी सवय, कुठल्या ना कुठल्या रूपात पडद्यावर दिसते. म्हणूनच ‘हास्यजत्रे’तील कलाकार प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग बनतात. हास्यजत्रा पाहताना प्रेक्षक मनमुराद हसतो, त्याच वेळी तो स्वतःच्या जगण्याकडे नव्याने पाहतो. ‘हास्यजत्रे’तील विनोदाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याचे टायमिंग. कितीही उत्तम संवाद लिहिला असला तरी तो योग्य क्षणी, योग्य देहबोलीसह, योग्य लयीत सादर करणे ही वेगळी कला आहे. हास्यजत्रेतील कलाकारांनी ती उत्तमप्रकारे आत्मसात केली आहे. मराठी भाषेच्या विविध बोलींचा सुंदर वापर हास्यजत्रेत केला जातो. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत बोलली जाणारी मराठी तिचे हेल, लहेजे आणि शब्दवैभवाला विनोदाची जोड मिळाली आहे.

हास्यजत्रा परिवाराचे प्रमुख अर्थात ‘कॅप्टन ऑफ द शिप’ दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटे आहेत. ‘वेटक्लाऊड प्रॉडक्शन’मार्फत मोटे आणि गोस्वामी यांनीच या हास्यमालिकेची निर्मिती केली आहे. हास्यजत्रेची लोकप्रियता वाढवत नेत आणि त्याचा दर्जा टिकवून ठेवण्याचे काम या जोडीने इमानेइतबारे केले आहे. हास्यजत्रेच्या उत्तुंग यशाचे ते खऱ्या अर्थाने मानकरी आहेत. हास्यजत्रेसाठी उत्तमातील उत्तम लेखन करणाऱ्या सर्व लेखकांच्या कल्पनाशक्तीला, विनोदबुध्दीला सलाम आहे. लेखकांच्या कल्पकतेला कलाकारांच्या उत्स्फूर्त अभिनयाची दमदार जोड मिळाली आहे. सर्व घटकांनी मिळून हास्यजत्रेची धुरा समर्थपणे सांभाळली आहे आणि हास्यजत्रेचा मंच गाजवला आहे. हास्याची ही जत्रा अशीच सुरू राहिली पाहिजे, मराठी माणसाच्या चेहऱ्यावरचे हास्य कधीच मावळू नये…अशी सर्वांचीच भावना आहे.






















Join Our Whatsapp Group