पिंपरी (Pclive7.com):- “पिंपरी-चिंचवड शहर हे महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय वेगाने प्रगती करणारे शहर आहे. या शहराचा विस्तार आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा पाहता, आपल्या महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागावर फार मोठी जबाबदारी असते. रस्ते, पाणी, उड्डाणपूल आणि पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये कोणतीही तडजोड चालत नाही. मनोज सेठीया यांच्यासारखा दांडगा तांत्रिक अनुभव असलेला आणि कामाचा उरक असलेला अधिकारी शहर अभियंता पदी आल्यामुळे नक्कीच आपल्या विकासाच्या प्रत्येक कामाला अधिक गती आणि पारदर्शकता येईल,” अशा शब्दांत स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी नवनिर्वाचित शहर अभियंता मनोज सेठीया यांच्या कर्तृत्त्वाचा गौरव केला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शहर अभियंता पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मनोज सेठीया यांचा स्थायी समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी सभापती अभिषेक बारणे यांनी सेठीया यांच्या आजवरच्या कामाच्या शैलीचे आणि अनुभवाचे खुलेपणाने कौतुक केले.
पुढे बोलताना अभिषेक बारणे म्हणाले की, “सेठीया यांनी आपल्या सेवाकाळात नेहमीच प्रशासकीय शिस्त आणि कामाचा वेग कायम ठेवला आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या कानाकोपऱ्यात ज्या विविध विकासकामांचे नियोजन सुरू आहे, त्यांना प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्याचे मोठे आव्हान शहर अभियंता पदावर असते. मनोज सेठीया यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग अधिक जोमाने काम करेल आणि शहरातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार नागरिक सुविधा मिळवून देण्याच्या आमच्या स्वप्नाला आणखी बळ मिळेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.”


या सत्कारानंतर आपले मनोगत व्यक्त करताना शहर अभियंता मनोज सेठीया यांनीही स्थायी समिती सभापती आणि पदाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ” महापालिका पदाधिकारी आणि प्रशासकीय नेतृत्वाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, ती मी पूर्ण निष्ठा, प्रामाणिकपणा आणि वेळेच्या अचूकतेने पार पाडेन. शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा देणे आणि प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावणे हेच माझे मुख्य ध्येय असेल,” अशी ग्वाही यावेळी सेठीया यांनी दिली.
यावेळी, अतिरिक्त आयुक्त निलेश जंगम, तृप्ती सांडभोर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख तसेच स्थायी समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group