पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील मोठा प्रश्न असलेल्या शास्तीची धास्ती आता मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. दररोज शास्तीच्या प्रश्नासंदर्भात एक तरी एसएमएस येत असल्याची जाहिर कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर येत्या १५ दिवसांत शास्तीचा निर्णय मंत्रीमंडळात घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी चिंचवड येथे केली.
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीतील कामांचे आज (बुधवारी) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘ई-भूमिपुजन’ करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर राहुल जाधव, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चौबुकस्वार, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील आमदार, पदाधिकाऱ्यांनी शास्तीची इतकी धास्ती घेतली आहे की, दररोज मला एक एसएमएस पाठवतात. त्यामुळे मी देखील शास्तीची धास्ती घेतली आहे. शास्तीकर माफ तर करायचा आहेच पण तुमच्या एसएमएसच्या तगाद्यामुळे शास्तीचा निकाला लावयाचे ठरवले असल्याचे सांगत येत्या १५ दिवसात शास्तीकर संदर्भातील निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल. सामान्य माणसाला दिलासा मिळाला पाहिजे, असा प्रकारचा निर्णय घेवू पण त्यासोबत कुठेही अनधिकृत बांधकामाला मी समर्थन देतोय, त्याला पाठींबा देतोय, अशी परिस्थिती येवू नये, शहरात भविष्यात एकही अनधिकृत बांधकाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.






















Join Our Whatsapp Group