भोसरीत ‘विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा’; शहर भाजपा-पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे शक्तिप्रदर्शन
पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने आयोजित ‘विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा’ भोसरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राष्ट्रविकास, जनसेवा आणि संघटनबळ अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करत भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘विकसित भारत’ संकल्पनेचा जयघोष केला.
भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या संकल्प सभा व यात्रेला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सेवा, सुशासन आणि विकास या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासाभिमुख योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासह राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संघटन अधिक सक्षम करण्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला जनसहभाग आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय योगदानाची जोड देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमास आमदार शंकर जगताप, उमाताई खापरे, अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, गटनेते प्रशांत शितोळे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, संजय पटनी, वैशाली खाड्ये, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडी प्रभारी राजेश पिल्ले यांच्यासह सर्व मंडलाध्यक्ष, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सेवा ज्योती यात्रा’च्या माध्यमातून राष्ट्रसेवा, जनसेवा आणि विकासाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि उत्स्फूर्त सहभागामुळे भोसरी परिसरात भाजपाच्या संघटनशक्तीचे दर्शन घडले. ‘संकल्प विकासाचा, ज्योत सेवेची आणि ध्यास विकसित भारताचा’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेली ही यात्रा आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारी ठरली.
‘विकसित भारत’ ही केवळ संकल्पना न राहता ती प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आणि नागरिकाची आहे. सेवा, सुशासन आणि विकासाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण सातत्याने केला पाहिजे. ‘सेवा ज्योती यात्रा’च्या माध्यमातून राष्ट्रसेवेची भावना अधिक दृढ झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला जनसहभागाची जोड देत विकासाच्या प्रवाहात प्रत्येक घटकाला सहभागी करून घेण्याचा निर्धार आपण करूया. संघटनेची ताकद ही कार्यकर्त्यांच्या एकजुटीत आहे आणि हीच एकजूट राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला अधिक बळ देईल.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.