वाकड (Pclive7.com):- टेम्पोच्या टपावर बसलेल्या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास सोलिटेअर सोसायटी, पिंक सिटी रोड, वाकड येथील अंडरपासमध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालक तुषार ज्योतीराम माने (वय २२, रा. आदर्श कॉलनी, वाकड) हा टाटा टेम्पो (एमएच १४ एलबी ४५९८) चालवत होता. या टेम्पोच्या टपावर ऋषी धनंजय कुदळे (वय २०, रा. लक्ष्मीनगर, थेरगाव) हा बसला असल्याची चालकाला माहिती होती.

असे असतानाही चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून टेम्पो भरधाव व निष्काळजीपणे अंडरपासमधून नेला. यावेळी टेम्पो अंडरपासमधील कॉलमला धडकला. या अपघातात टपावर बसलेल्या ऋषी कुदळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी धनंजय श्रीनिवास कुदळे (वय ५०, रा. महादेव कॉलनी, लक्ष्मीनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाकड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

















Join Our Whatsapp Group