पीएसआय ते सहायक आयुक्त: १५० अधिकारी एकत्र; ९१ वर्षांचे ज्येष्ठ आणि ५८ वर्षांचे तरुण सहभागी, ‘रिट्रीट’ बिगुलने सुरुवात
पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र पोलिस दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे नुकतेच स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. महात्मा फुले वसतिगृहाचे दरोडे सभागृह येथे आयोजित कार्यक्रमास पोलिस उपनिरीक्षक पदावर कारकीर्द सुरू करून सहायक पोलिस आयुक्त किंवा त्यावरील पदावर निवृत्त झालेले १५० अधिकारी उपस्थित होते. त्यात १० महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता.

एकाच प्रशिक्षण तुकडीतील अधिकाऱ्यांची स्नेहसंमेलने अनेकदा होतात; मात्र अशा प्रकारचे संमेलन यापूर्वी कधीही झाले नव्हते, असे आयोजकांनी सांगितले. उपस्थितांमध्ये वयाने ज्येष्ठतम अधिकारी ९१ वर्षांचे, तर तरुणतम अधिकारी ५८ वर्षांचे होते. ३३ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यापासून अवघ्या ३० दिवसांपूर्वी निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यापर्यंत सर्व जण एकाच व्यासपीठावर आले. निवृत्त सहायक पोलिस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हे संमेलन साकारले. त्यांनीच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘रिट्रीट’ या बिगुल कॉलने झाली. हा बिगुल कॉल सर्व पोलिस मुख्यालयांत सूर्यास्ताला ध्वज उतरवताना वाजवला जातो. सेवाकालाच्या समाप्तीनंतर आयुष्याच्या सायंकाळी होणाऱ्या स्नेहसंमेलनाची सुरुवात त्यामुळे अत्यंत समर्पक ठरली. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत निधन झालेल्या ६० पोलिस अधिकाऱ्यांची नावे वाचून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन सुरेंद्र देशमुख यांनी केले.
वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांपैकी माधव गोविंद चिरमे (९१ वर्षे), मधुकर बापूराव झेंडे (८८), मल्लिकार्जुन भगवान अपुणे (८३),अब्दुल सत्तार शेख (८१), शरद बन्सीधर माने (७९), दिलीप चिंतामणी शेपाळ (७८), हनुमंत पंडितराव कुलकर्णी (७८), दिगंबर शंकर टोम्पे (७८), विनायक बळवंत जाधव (७८), दिलीप भास्कर शिंदे (७७), श्रीकांत बाळासाहेब पाटील (७७), सुरेश कृष्णाजी कमलाकर (७५) यांचा ह्रदय सत्कार करण्यात आला.

मधुकर झेंडे यांनी एनसीसी जीवनातील ‘O My Darling Clementine’ या गीताचा मराठी अनुवाद ‘माझी लाडकी सुशीला’ सादर करून उपस्थितांना चकित केले.तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्ल शोभराज यास दोनवेळा कशाप्रकारे अटक केली हे सुद्धा विषद केले.
संपत भोसले, राजेंद्र कदम, उज्ज्वला पिंगळे, राजेंद्र जोशी आणि कैलास पिंगळे या पोलिस अधिकाऱ्यांच्या अपत्यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या दैदीप्यमान कामगिरीबद्दल त्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मनोहर जोशी,.आयर्नमॅन किताब दोनदा पटकावणारे विष्णू ताम्हाणे, व्यंगचित्रकार, कवी, लेखक राम मांडुरके, क्रिकेटपटू व सामाजिक कार्यकर्ते विनोद सातव यांचाही सत्कार करण्यात आला.
रवींद्र रसाळ, प्रकाश लगड, गणपतराव माडगूळकर, देविदास पाटील, प्रभाकर ढमाले, सुहास गरुड, दीपक हुंबरे आणि जगदीश सातव या सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांनी संमेलनाच्या आयोजन व यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. यापुढेही असेच मेळावे आयोजित करून एकत्र यावे अशा इच्छा अनेक वयस्कर मंडळींनी व्यक्त केल्या.


















Join Our Whatsapp Group