पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. ते सोबत आले तर ठिक अन्यथा स्वतंत्र लढण्याची आमची तयारी आहे. राज्यातील ४८ पैकी ४१ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. त्यापैकी युती शिवाय ४० जागा आम्ही जिंकू असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
भाजपच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीसाठी आज दानवे चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, पिंपरी चिंचवड नव नगरविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महिला अध्यक्षा शैला मोळक, प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, उमा खापरे आदी उपस्थित होते.
रावसाहेब दानवे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजपा सज्ज आहे. राज्यातील ४८ मतदारसंघाचा आढावा दौरा सध्या सुरू आहे. आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्याची बैठक घेऊन आढावा घेणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना करणार आहोत. मित्र पक्षांना सोबत घेऊनच निवडणुकांना सामोरे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवसेना आणि भाजपात कुठलाच मुद्दा वादाचा नाही. लवकरच युती संदर्भात बोलणी सुरू होतील. भाजपाकडून जरी स्वतंत्रपणे प्रत्येक मतदार संघाची बांधणी केली जात असली तरी त्याचा फायदा हा युतीच्याच उमेदवाराला होणार आहे. दररोज भाजप विरोधात कितीतरी आघाड्या होत आहेत, त्याचा आम्हाला काहीच फरक पडणार नाही. पाच राज्यातील पराभव हा निवडणुकीचा एक भाग आहे. परंतू आमचा आत्मविश्वास कमी झालेला नाही. देशाचे पुढचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच होणार आहेत.
शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा सकारात्मक आहे. यापूर्वी अनेक निवडणुका आम्ही एकत्र लढल्या आहेत. आता शिवसेना सोबत आली तर ठिक अन्यथा स्वतंत्र लढण्याची भाजपाची तयारी आहे. ४१ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला असून युती शिवाय ४० जागा आम्ही जिंकू असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.






















Join Our Whatsapp Group