कर्जत (Pclive7.com):- कर्जत नगरपरिषदेसाठी मनसेचे उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत नगरपरिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार रंगायला सुरुवात झाली असून या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे आणि एसआरपी या पक्षाने महाआघाडी केली आहे.
कर्जत नगपरिषदेच्या एकूण 18 जागा असून मनसेने आधी या सगळ्या जागांवर आपले उमेदवार देण्याचं जाहीर केलं होतं. मात्र अचानक मनसेचे पदाधिकारी आणि उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसोबत अर्ज भरायला पोहोचल्याने सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं. अर्ज भरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि एसआरपीच्या आघाडीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी आपण महाआघाडीत सामील झालो असून आपण 18 ऐवजी एकाच जागेवर निवडणूक लढवणार असून ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढणार असल्याचं सांगितलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिक्षा सुरेश लाड यांनी मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पत्रकावर राष्ट्रवादी, मनसे, एसआरपी महाआघाडीच्या सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर या पत्रकावर शरद पवारांच्या फोटोच्या बाजूला राज ठाकरेंचा फोटोही छापण्यात आला आहे.
कर्जत नगरपरिषदेवर गेली 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी शिवसेना भाजप युतीने भगवा झंझावात कर्जतमध्ये निर्माण केला आहे. या झंझावातामध्ये आपला पालापाचोळा होणार या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला आणि स्थानिक पक्षांना सोबत घेण्याची धडपड सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली. या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्यांमध्ये मनसेही सामील होती. त्यावेळी संघर्ष करणाऱ्या या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने जबरदस्त धक्का बसला आहे.





















Join Our Whatsapp Group