पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रायगड ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग समितीची बैठक सभागृहात पार पडली. या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या प्रस्तावित पार्किंग धोरणाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नगरसेविका सौ. स्नेहा रणजित कलाटे यांनी प्रभागातील पार्किंग व्यवस्था, वाढते अतिक्रमण, फूटपाथवरील अनधिकृत व्यवसाय तसेच आरोग्य सुविधांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहनसंख्या, अपुऱ्या पार्किंग सुविधा, रस्त्यांवरील वाहतुकीचा वाढता ताण आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या पार्किंगच्या समस्या लक्षात घेता, प्रभावी व नागरिकाभिमुख पार्किंग धोरण राबविण्याबाबत विविध महत्त्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडले. रस्त्याच्या कडेला दीर्घकाळ अथवा कायमस्वरूपी पार्किंग करून ठेवण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी बेवारस व वापरात नसलेली वाहने रस्त्याच्या कडेला पडून आहेत. अशा वाहनांची तपासणी करून संबंधित वाहनधारकांना नोटीस देणे, अनधिकृतपणे पार्क केलेल्या वाहनांवर तसेच बेवारस वाहनांवर नियमानुसार कारवाई करणे आणि रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियमित कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी नगरसेविका सौ. कलाटे यांनी केली.
याचबरोबर प्रभागातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येकडेही त्यांनी प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष वेधले. फूटपाथवर होणारी अतिक्रमणे, पथारी व्यावसायिक, हातगाड्या, दुकानदारांकडून ठेवण्यात येणारे साहित्य आणि अनधिकृत पार्किंग यामुळे पादचाऱ्यांना विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. फूटपाथ हे नागरिकांच्या सुरक्षित व मुक्त वापरासाठी असतात. त्यामुळे फूटपाथ अतिक्रमणमुक्त करून पादचाऱ्यांसाठी खुले ठेवावेत, अतिक्रमणांवर नियमित व प्रभावी कारवाई करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदारीचे पालन करावे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

तसेच प्रभागातील आरोग्य सुविधांचा दर्जा, स्वच्छता व्यवस्था आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबतही नगरसेविका सौ. कलाटे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. नागरिकांच्या तक्रारी केवळ कागदोपत्री निकाली न काढता प्रत्यक्ष पाहणी करून समस्यांचे निराकरण करावे आणि आवश्यक आरोग्य व स्वच्छता सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
या बैठकीस स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, ‘ज’ प्रभाग समिती अध्यक्षा श्रीमती आरतीताई चोंधे, सर्व नगरसेविका व नगरसेवक, पोलीस वाहतूक विभागाचे अधिकारी तसेच महानगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शहराचा सुनियोजित विकास, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, अतिक्रमणमुक्त फूटपाथ, शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था आणि दर्जेदार नागरी आरोग्य सुविधा या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत. या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कार्यवाही करावी. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या समस्यांचे निराकरण होईपर्यंत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असून, नागरिकांच्या हक्काच्या सुविधा मिळवून देण्यासाठी ठामपणे प्रयत्नशील राहणार असल्याचे नगरसेविका सौ. स्नेहा रणजित कलाटे यांनी स्पष्ट केले.
Tags: Sneha Kalate


















Join Our Whatsapp Group