पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून २०१९-२० येत्या आर्थिक वर्षात कोणतीही करवाढ करण्यात येणार नाही. मिळकत कर जैसे थे ठेवले जाणार असल्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या निर्णयावर अंतिम ‘शिक्कामोर्तब’ होणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड या होत्या.
पिंपरी चिंचवड शहरात सुमारे सव्वा चार लाख मिळकती आहेत. या मिळकतींकडून महापालिका कर आकारणी करते. मालमत्ता करातून महापालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होतो. २०१७-१८ या आर्थिक वर्षात महापालिकेला मालमत्ता करातून ४३१ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. चालू आर्थिक वर्षात जानेवारी अखेरपर्यंत मालमत्ता करातून ३३६ कोटींचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला असून मार्च अखेरपर्यंत एकूण ५०७ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळविण्याचे महापालिकेचे उदिष्ट आहे. आगामी २०१९-२०२० या आर्थिक वर्षात कोणतीही करवाढ न करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. त्यामुळे नव्याने कर आकारणी होणाऱ्या सुमारे ३० हजार मिळकतधारांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.
या कराचे दर २० फेब्रुवारीपर्यंत करणे बंधनकारक होते. त्यानुसार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोणतीही दरवाढ नसलेला प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजूरीसाठी आयत्यावेळी ठेवला होता. त्यामध्ये कराचे दर जैसे थे ठेवण्यात आले होते. या प्रस्तावाला स्थायीने मंजूर देऊन मान्यतेसाठी महासभेकडे पाठवला आहे. येत्या २० फेब्रुवारीला महासभेत या प्रस्तावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. यंदाच्या वर्षी मालमत्ता करात कोणतीही दरवाढ न झाल्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी काही दिवसांपूर्वीच यंदाच्या वर्षात कोणतीच करवाढ करू नये अशी सूचना महापालिका आयुक्तांना केली होती.


















Join Our Whatsapp Group