पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये आज विरोधी पक्षांनी एकत्र गाजर आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी शास्ती कर माफ केल्याची तिसाऱ्यांदा केलेली घोषणा ही हवेत विरल्याने त्याचा निषेध म्हणून विरोधकांनी हे आंदोलन केले. यावेळी मानवी साखळीव्दारे महापालिकेला गाजरांसह घेराव घालण्यात आला. त्यानंतर पालिकेच्या प्रवेशद्वाराला आणि आयुक्तांच्या गाडीला गाजराचा हार घालत हे आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री तसेच सत्ताधारी भाजपाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

आज दुपारी झालेल्या या आंदोलनास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख योगेश बाबर, मनसे गटनेते सचिन चिखले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विरोधी पक्षातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण, एमआयडीसी व म्हाडा क्षेत्रातील वर्षानुवर्षे भिजत पडलेल्या संपूर्ण शास्तीकर माफी, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोड असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांकडे सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी सर्व पक्षीय व सामाजिक संस्थाच्यावतीने हातात गाजर घेऊन मानवी साखळीव्दारे महापालिका मुख्यालयास घेराव घालून हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहरातील नागरिकही सहभागी झाले होते.

यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे आणि नाना काटे यांनी महापालिकेच्या प्रवेशव्दाराला गाजरांचा हार घातला. त्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या गाडीलाही गाजरांचा हार घालून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.





















Join Our Whatsapp Group