पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य महारक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमातून तब्बल ४ हजार ७२९ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील ३२ प्रभागांमध्ये ४३ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शाळा, मंगल कार्यालये, सभागृहे, देवस्थाने तसेच संपर्क कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेल्या केंद्रांवर दिवसभर रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
या उपक्रमात आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, महापौर रवी लांडे, सभागृहनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, उपमहापौर शर्मिला बाबर, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस मधुकर बच्चे, वैशाली खाडे, विकास डोळस यांच्यासह ३२ प्रभागांतील नगरसेवक-नगरसेविका, १४ मंडल अध्यक्ष आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

महाआरोग्य आणि रक्तदान उपक्रमांतर्गत युवक, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यात पिंपरी-चिंचवडकरांनी दाखविलेला उत्साह आणि सामाजिक जाणीव कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था तसेच रक्तदान करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले. शहरातील रक्तपेढ्यांना मोठ्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम सामाजिक क्षेत्रात आदर्श ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.





















Join Our Whatsapp Group