पिंपरी (Pclive7.com):- पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत धरण 92.55 टक्के भरले आहे. या पार्श्वभूमीवर पवना धरण प्रकल्प प्रशासनाने पवना नदीकाठच्या ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी आणि लाभधारकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात सातत्याने पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्याही क्षणी पवना नदीपात्रात कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते. विसर्ग करण्यापूर्वी जलसंपदा विभागामार्फत आवश्यक माहिती आणि सूचना प्रसारित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे नदी, नाले आणि ओढ्यांमधील पाणीपातळी अचानक वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीपात्रात ठेवलेले साहित्य, शेतीची अवजारे, कृषी पंप आणि जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. स्थानिक जिल्हा व तालुका प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पवना धरणातील पाणीसाठा 92 टक्क्यांहून अधिक झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.




















Join Our Whatsapp Group