पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांना राज्य सरकारने एक खूशखबर दिली आहे. पुणे मेट्रो आता पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यासंदर्भात आराखडा मंजूर करून राज्य सरकारकडे मंजूरीसाठी पाठविला होता. त्याला राज्य शासनाने त्याला आज मंजूरी देण्यात आली आहे. आता केवळ केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतिक्षा आहे.
पुणे-पिंपरी चिंचवडचा महाराष्ट्रातील मोठ्या नागरी समुहात समावेश होतो. विविध उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील वाढीमुळे गेल्या दोन दशकात शहरात लोकसंख्या आणि रोजगारामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही दशकात पिंपरी चिंचवड परिसरात शहरीकरणात वेगाने वाढ होत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, पीसीएमसीची लोकसंख्या १७.२७ लाख होती आणि २०१७ पर्यंत लोकसंख्या २१ लाख होऊन २०२८ आणि २०३८ या वर्षातील लोकसंख्या अनुक्रमे ३०.९ लाख आणि ३९.१लाख होण्याचा अंदाज आहे.
सध्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कॉरिडोर-1 म्हणजेच पीसीएमसी ते स्वारगेट (१६.५९८ किमी) मेट्रो मार्गिकेच्या बांधकाम करीत आहे. त्यापैकी पी.सी.एम.सी. पासून रेंजहिल पर्यंत डिसेंबर २०१९ पर्यंत मेट्रो कार्यान्वित करण्यात येणारअसून रेंजहिल – स्वारगेट नोव्हेंबर २०२१ पर्यंत कार्यान्वित करण्याचा मानस आहे. पी.सी.एम.सी. ते निगडी या मार्गाच्या विस्तारासाठी सर्वसामान्य नागरीक, निर्वाचित प्रतिनिधी, तसेच इतर भागधारांकडून मागण्या प्राप्त झाल्या होत्या.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, पीसीएमसी ते निगडी या विस्तारीत मेट्रो मार्गाची नितांत गरज आहे व यामुळे निगडी (भक्ती शक्ती चौक) थेट स्वारगेट, मंडई, फडके हौद, शिवाजीनगर, सिविल कोर्ट या भागांशी जोडला जाईल. मेट्रोचा पूर्व – पश्चिम मार्गिका जी पीसीएमसी ते स्वारगेट अशी बनविण्यात येत आहे. आता या विस्तारामुळे पुणे पिंपरी चिंचवड महानगरच्या पश्चिमेकडील दाट वस्ती असलेल्या सर्व भागांना जोडण्याचे काम होईल.
पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व दाट लोकवस्ती असलेले भाग मेट्रोमुळे जोडले जातील. या विस्तारामुळे एक प्रभावी शहरी वाहतूक व्यवस्था निगडी, पिंपरी चिंचवडकरांना मिळणार असून, या भागातील वाहतूक सुरळीत व्हायला खूप मदत होणार आहे. या बरोबरच पीसीएमसी ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेची प्रवासी वाहतूक देखील वाढणार आहे.