पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील १ हजार चौरस फुटापर्यंच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ झाला असल्याचा अध्यादेश भाजपाकडून जाहिर करण्यात आला आहे. या निर्णयाचा कोणालाच फायदा होणार नाही. सरसकट शास्तीकर माफ झाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्यापासून होती. आता भाजपकडून काढण्यात आलेला अध्यादेश म्हणजे पिंपरी चिंचवडकरांना पुन्हा दाखविलेले ‘गाजर’च ठरणार असल्याचा ‘हल्लाबोल’ राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, कार्याध्यक् प्रशांत शितोळे, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप उपस्थित होते.
प्रशांत शितोळे म्हणाले, अनधिकृत बांधकामाचा संपुर्ण शास्तीकर माफ करावा, अशी पिंपरी चिंचवडकर नागरिकांसह आमचीही मागणी आहे. तसे न करता भाजपने एक हजार चाैरस फुटापर्यंत माफीचा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेवून त्याची अमंलबजावणी होणे शंकास्पद आहे. त्याशिवाय हा आदेश काढल्याच्या दिनांकापासून निर्णय लागू असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुर्वलक्षी प्रभावाने शास्तीकर माफ होणार का? हा सुध्दा प्रश्न आहे.
भाजपचे नेते म्हणतात हे पाप राष्ट्रवादी-काँग्रेसचे आहे, पण आम्ही म्हणतो. गोरगरीबांनी काबाडकष्टांतून ही घरे बांधली आहेत. त्यांनी बांधलेल्या घरांना तुम्ही पाप कसे काय म्हणता, तसेच तुम्हाला हा प्रश्न सोडवून पुण्य करायची संधी दिली, ती संधी तुम्ही घेतली नाही. त्यामुळे लोकांचा भाजपवर व स्थानिक नेत्यावर भरवसा राहिला नाही. किती वेळा, लोकांना फसविणार तुम्ही, बाहेर जावून पेढे वाटायचे, फ्लेक्स लावायचे, आता हत्तीवरुन पेढे वाटा मग, नाही तर स्वत:ची पाठ त्यांनीच बडवून घ्यावी.
मुळात भाजपला मागील साडेचार वर्षात हा निर्णय घेतला नाही. दोन दिवसात आचारसंहिता लागणार असून या निर्णयाची लगेच अमंलबजावणी होणार कशी, हा प्रश्नच आहे. शास्तीकराबाबत दिलेल्या आदेशात कुठेही ‘पूर्वलक्षी’ प्रभावाने माफ असा उल्लेख केला नाही. खोटे बोल पण रेटून बोल या पद्धतीने खोटे सांगून जनतेची फसवणूक केली जात आहे. मालमत्ता धारकांना आजपर्यंतचा शास्तीकर भरावा लागणार असून पुन्हा एकादा नव्याने गाजर दाखविले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार नाही”
संजोग वाघेरे म्हणाले, ”निवडणुकीवेळी शंभर टक्के शास्तीकर माफ करु अशा घोषणा भाजपच्या नेत्यांनी केला होत्या. परंतु, सत्ता जाण्याची वेळ आली. तरी, शास्तीकर माफ झाला नाही. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सुटला नाही. अगोदर ५०० चौरस फुटापर्यंतच्या आणि आता १ हजार चौरस फुटापर्यंतच्या अवैध बांधकामाचा शास्तीकर माफ केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सरसकट शास्तीकर माफी आणि अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे काय झाले? ” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.






















Join Our Whatsapp Group