पिंपरी (Pclive7.com):- भाजप, शिवसेनेची युती झालीयं. मावळ लोकसभा मतदार संघावर शेवटपर्यंत भाजपा दावा असणार आहे. ती जागा शिवसेनेकडे केलीचं तर मी युतीचा धर्म पाळणार आहे. आपण कधीच ‘अधर्मा’ने वागत नाही. पण समोरचा धर्म पाळणारा असावा असे सांगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपली पुढील भूमिका ‘गुलदस्त्यात’ ठेवली आहे.
पिंपरी येथे पत्रकार परिषदेत आमदार जगताप बोलत होते. त्यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, अमित गोरखे, उमा खापरे, अमोल थोरात, प्रमोद निसळ उपस्थित होते.
मावळ लोकसभा मतदार संघावर गेल्या दोन निवडणुकांपासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. यावेळी मात्र हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा, याकरिता दबावतंत्र वापरण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांसह आमदार जगताप सर्मथकांकडून या मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी लेखी मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान मावळ शिवसेनेकडेच राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
मावळ शिवसेनेकडेच राहिला तर तुम्ही युतीचा धर्म पाळणार का..? या प्रश्नाला उत्तर देताना आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, मावळ लोकसभा मतदार संघ सोडायला शिवसेना तयार नाही. त्यामुळे मतदार संघ मिळण्याची शक्यता कमी आहे. मावळ सेनेकडे राहिल्यास मी युतीचा ‘धर्म’ पाळणार आहे. आपण कधीच ‘अधर्मा’ने वागत नाही. पण समोरचा धर्म पाळणारा असावा असे सांगत निवडणुकीत नेमकं काय करणार याचं सस्पेन्स मात्र वाढवलं आहे.
पुढे बोलताना जगताप म्हणाले की, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघावरील उमेदवारी अर्ज भरेपर्यंत दावा सोडणार नाही. तसेच शिवसेनेने महापालिकेच्या सत्तेत सहभाग मागितल्यास त्यांना सहभागी करून घेण्यात येईल. महापालिकेत अनेक विषय समित्या आहेत, त्यात त्यांना संधी दिली जाईल, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.





















Join Our Whatsapp Group