पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षे खासदारांनी कोणतीही विकासकामे केलेली नसल्यामुळे जनतेपुढे मतं मागायला मुद्दाच नसल्याने पार्थ पवारांवर वैयक्तिक खोटे आरोप करणारे ‘विजयबापू शिवतारे म्हणजे दिवा विझण्या पुर्वीची फडफड’ आहे, अशी जहरी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.
अमित बच्छाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवारांची वाढती लोकप्रियता पाहून शिवसेनेच्या आता पोटात दुखू लागल्याने त्यांनी पार्थ पवारांची बदनामी करण्याचा डाव आखला आहे. परंतू याला जनता प्रतिसाद देणार नाही. म्हणून स्वत:चे राजकीय आयुष्य लाचारी करण्यात खर्ची करणारे शिवसेनेचे विजयबापू शिवतारेंनी प्रथमत: आपली पात्रता तपासावी. पार्थ पवारांवर आरोप करणाऱ्या शिवतारेंची अवस्था हि पाण्यात वाहून जाणाऱ्या ओंडक्यासारखी झाली आहे. पाणीप्रश्न,बेरोजगारी, पुरंदर तालुक्यातील दुष्काळ, असे अनेक प्रश्न शिवतारे राज्यमंत्री असताना देखील सोडविता न आल्याने जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवतारेंना जनता विधानसभेला घरचा रस्ता दाखवेल. मुंबईमध्ये रात्रभर पब चालू राहावे अशी मागणी खुद्द आदित्य ठाकरेंनी केली होती. त्यामुळे पबमध्ये जाण्याची संस्कृती कुणाची आहे? हे न समजण्या इतपत जनता दुधखुळी नाही. स्वत:चा नाकर्तेपणा लपविण्यासाठी पवार साहेब व पवार कुटूंबियांवर गलिच्छ आरोप हे शिवतारे करीत आहेत. केवळ विरोधाला विरोध म्हणून पार्थ पवारांबद्दल खालची भाषा वापरली तर ते आम्ही कदापी सहन करणार नाहीत, असा इशारा बच्छाव यांनी दिला आहे.





















Join Our Whatsapp Group