पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आज प्रचारानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात आहेत. त्यांनी आज शहरातील विविध लोकांच्या भेटी घेतल्या. यावेळी पार्थ पवार यांनी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची देखील भेट घेतली. पार्थ पवार आणि मारुती भापकर यांच्यामध्ये तब्बल २० मिनिटे चर्चा झाली.
यावेळी मारुती भापकर यांनी पार्थ पवार यांना पिंपरी चिंचवड महापालिकेची कशा प्रकारे भाजपाकडून लूट सुरू आहे. तसेच मावळ मतदारसंघात असलेले प्रश्न सोडविण्याची विनंती यावेळी पार्थ पवार यांना केली. तसेच दोघांनी एकमेकांची विचारपूस करुन हातात हात दिला. या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याने हे दोघे एकत्र आल्यामुळे पुढची समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मावळमध्ये पार्थ पवारांविरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे रणांगणात आहेत. आज पार्थ पवार आणि मारुती भापकर एकत्र आल्यामुळे वेगळ्याच चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२००९ आणि २०१४ साली मारुती भापकर स्वतः लोकसभेच्या रिंगणात होते. त्यामुळे भापकर यांना या मतदारसंघाची संपूर्ण माहिती असल्याने त्यांनी पार्थ पवारांना पाठिंबा दिल्यास राजकीय गणित बदलू शकतात.





















Join Our Whatsapp Group