पिंपरी (Pclive7.com):- शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची आज भेट झाली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान या भेटीमुळे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
लोकसभा निवडणूक अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वत्र प्रचाराचे वारे जोरात वाहू लागले आहे. सर्व उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर देत जोरदार कंबर कसली आहे. शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आज भोसरी विधानसभेच्या दौऱ्यावर होते. सकाळपासूनच भोसरीच्या दौऱ्यावर असलेल्या अमोल कोल्हे यांनी संपूर्ण मतदारसंघ गाठीभेटी घेत पिंजून टाकला. दुपारच्या दरम्यान भोसरीचे भाजपाचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांची अचानकपणे भेट झाली. त्यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाना लोंढे हे देखील उपस्थित होते. समोरासमोर येताच कोल्हे आणि लांडगे त्या दोघांनी हस्तांदोलन करत चर्चा देखील केली. यावेळी नेमकी या दोघांमध्ये काय चर्चा झाली याचा खुलासा झाला नसला तरी काहीतरी शिजलयं.. याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्याला कारणही तसंच आहे. शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महेश लांडगे यांच्यात ‘दिलजमाई’ झाली खरी, परंतु ही वरवरची झाल्याचेच बोलले जात आहे. त्यामुळे भोसरी विधानसभेतील महेश लांडगे यांचे समर्थक नगरसेवक आढळराव यांच्या प्रचारात म्हणावे असे सक्रिय झालेले दिसत नाहीत. त्यातच आज आमदार लांडगे आणि अमोल कोल्हे यांच्यात झालेल्या ‘दिलखुलास’ भेटीमुळे आढळराव आणि त्यांच्या समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
आता निवडणुकीला केवळ पंधरा दिवस बाकी आहेत. त्यामुळे आज झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून महेश लांडगे समर्थकांमध्ये देखील वेगळा संदेश गेला असल्याचे बोलले जात आहे. याबाबत स्वतः महेश लांडगे यांनी कोणते वक्तव्य केले नाही.






















Join Our Whatsapp Group