पुणे (Pclive7.com):- पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघांचा भावी खासदार नक्की कोण असणार, हे आज मंगळवारी (दि.२३) मतदारराजा निश्चित करणार आहे. पुणे मतदारसंघात प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजप अशी, तर बारामती मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरळ लढत असणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत किती टक्के मतदान होणार याकडे जाणकारांचे लक्ष आहे. पुण्यात मतदार पुन्हा भाजपला संधी देणार की, काँग्रेसचे पुनरागमन होणार आणि बारामतीत मतदार पुन्हा राष्ट्रवादीला संधी देणार की, भाजप चमत्कार घडविणार, हाच आता औत्सुक्याचा विषय आहे. यामुळे या दोन्ही मतदारसंघांत विधानसभा मतदारसंघनिहाय, गावनिहाय किती मतदान होते याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.
मतदानाच्या टक्केवारीनुसारच मंगळवारनंतर (दि.२३) मतमोजणीपर्यंत तर्कवितर्क लढविले जाणार आहेत. निकाल २३ मे रोजी जाहीर होणार असला, तरी पुणे आणि बारामतीचे खासदार कोण होणार, हे मंगळवारी मतदान यंत्रात सीलबंद होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून तब्बल ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये भाजपकडून गिरीश बापट, काँग्रेसकडून मोहन जोशी, बसपकडून उत्तमराव शिंदे या राष्ट्रीय पक्षांसह बहुजन वंचित आघाडीचे अनिल जाधव आणि अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
पुण्यात भाजप सलग दुसर्यांदा जिंकणार ?
पुण्यातून लोकसभेच्या १६ निवडणुका झाल्या आहेत. काँग्रेसने आतापर्यंत आठ वेळा ही जागा जिंकली आहे, तर तीन वेळा भाजपला संधी मिळाली आहे. मात्र, आतापर्यंत सलग दोन वेळा एकदाही भाजपचा खासदार या जागेवरून निवडून आलेला नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत पुण्याची जागा भाजपने तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने जिंकली. विधानसभा, महापालिका निवडणुकीत भाजपने विजय मिळविला.
निवडणुकीत पुण्याची जागा सलग दुसर्यांदा जिंकण्याचा इतिहास घडवू, याची खात्री भाजप कार्यकर्त्यांना आहे; तर आता मोदी लाट ओसरली असल्याने गेलेली जागा पुन्हा खेचून आणू, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे.
याव्यतिरिक्त बहुजन वंचित विकास आघाडी तिसरा पर्याय म्हणून पुढे आली आहे. प्रामुख्याने दलित आणि मुस्लिम मतदारवर्ग यावर आघाडीची मदार आहे. त्यामुळे ते किती मते घेणार आणि त्याचा फटका नक्की कोणाला बसणार याची उत्सुकता आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.
बारामतीकडे देशभराचे लक्ष, मोठी यंत्रणा तैनात
बारामती लोकसभा मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांच्यामध्ये आहे. या वेळी भाजपने राष्ट्रीय पातळीवरून बारामती लोकसभा मतदारसंघात लक्ष घातल्याने मतदारसंघातील प्रचाराने टोकाची पातळी गाठली.
बारामतीच्या निकालाबाबत प्रथमच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता आणि चुरस मतदानाच्या टक्केवारीत दिसून येते का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. मतदारसंघात प्रथमच मोठ्या प्रमाणावर यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर उपाययोजना केलेल्या आहेत. बारामती मतदारसंघात या वेळी इतिहास घडवू, असे भाजपच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण सांगत आहेत. तर बारामती नेहमीप्रमाणे आम्हीच राखू, असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसमधून व्यक्त होत आहे. याव्यतिरिक्त वंचित विकास आघाडीचे नवनाथ पडळकर हा एक पर्यायही मतदारांसमोर आहे. बहुजन समाज पक्षाचे अॅड. मंगेश वनशिव आणि इतरही उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात २१ लाख १२ हजार ४०८ मतदार असून, २३७२ मतदान केंद्रे आहेत.























Join Our Whatsapp Group