पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराणेशाहीच्या माध्यमातून घरातील उमेदवार उभा करत आहे. हा माझा भारत देश म्हणजे पवारांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. हा सर्वसामान्य जनतेचा देश आहे. या देशातून सर्वसामान्यांचेच प्रतिनिधी जायला हवेत. घराणेशाहीला इथे थारा नाही, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
शिवसेना – भाजप – आरपीआय – रासप – शिवसंग्राम – रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 25) काळेवाडी फाटा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत ठाकरे बोलत होते. या सभेला पुण्याचे विभागीय नेते, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गो-हे, खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, आमदार बाळा भेगडे, संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, राज्य संघटक गोविंद घोळवे, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, बारामती जिल्हा प्रमुख अॅड. राजेंद्र काळे, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, आरपीआय नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, सल्लागार मधुकर बाबर, शहर प्रमुख योगेश बाबर, इरफान सय्यद, मावळ तालुका अध्यक्ष राजू खांडभोर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, शारदा सोनवणे, तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके आदी उपस्थित होते.
माजी खासदार गजानन बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. पवना जलवाहिनीग्रस्त शेतक-यांनी श्रीरंग बारणे यांना पाठिंबा जाहीर केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “महायुती होण्यापूर्वी आघाडीचे नेते लाकडी घोड्यावर बसून दिल्लीला निघाले होते. पण महायुती होताच त्यांचे लाकडी घोडे मोडून पडले. महाराष्ट्रात भगवं तुफान उसळलं आहे. ही भगवी मने महाआघाडीचा पराभव करणार आहेत. बारामतीची भानामती आता इथं चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जनतेने महापालिका, विधानसभेतून कधीच हद्दपार केले आहे. त्यामुळे आता महायुतीने ठरवले आहे ‘पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार’; त्यामुळे विरोधकांनी सुद्धा आता घरीच बसायचं ठरवलं आहे.
महायुतीचे ठरले आहे, ‘देशद्रोह्यांना फाशी द्यायची, घटनेतील 370 कलम रद्द करायचं, पाकिस्तानचं कंबरडं मोडायचं’. विरोधकांकडे देश विकासाची कोणतीही दिशा नाही. त्यांच्याकडे सक्षम उमेदवार देखील नाही. त्यांचा केवळ नरेंद्र मोदी आणि महायुतीला विरोध आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मागील पाच वर्षात देशाच्या संसदेत उत्तम काम केले आहे. त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा पुस्तक रुपाने मांडला आहे. विरोधकांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. श्रीरंग बारणे यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. निवडणुकीच्या तोंडावर विरोधक भेटीगाठी घेत आहेत. राष्ट्रवादीची ही दादागिरी जनता मोडून काढणार आहे. पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.
शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, हिंदुत्वाचा तेजस्वी भगवा देशावर फडवकायचा आहे. देशाच्या सवंसदेत क्रांतिकारकांच्या भूमीतील खासदार असला पाहिजे. संतांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची ही भूमी आहे. हा प्रदेश डाकूंचा झाला आहे. विधानसभा, महापालिका निवडणुकीत त्यांना घालविले आहे. आता हळूहळू उरले सुरले डाकू नष्ट करायचे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. देशाला ताकद देण्याची हिम्मत भगव्यात आहे. मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर देशात अंधकारमय होईल. त्यामुळे देशात शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी आणि दहशतवाद संपविण्यासाठी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी श्रीरंग बारणे यांना निवडणून देण्याचे आवाहन राऊत यांनी केले.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळच्या जनतेचे मागील पाच वर्षात देशाच्या संसदेमध्ये नेतृत्व करत असताना जनसामान्यांशी जोडून काम केले. पवना धरणातील चाळीस हजार ट्रक गाळ काढला. यामुळे धरणात सुमारे दीड महिन्याचा पाणीसाठा वाढला आहे. चापेकर बंधूंच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढले. जेएनपीटी रोड आठ पदरी केला. पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश केला. अशा प्रकारची अनेक लोकोपयोगी कामे केली. विरोधकांकडे कोणतेही विकासाचे मुद्दे नाहीत, त्यामुळे ते केवळ आरोप करून निवडणूक लढवत आहेत. जनतेने परिवाराला समोर न ठेवता देशहिताला समोर ठेवून मतदान करावे, असे आवाहन देखील बारणे यांनी केले.






















Join Our Whatsapp Group