पुणे जिल्ह्यातील युतीच्या चारही जागा विजयी होणार
पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी बाहेरून मोठी फौज आणून मावळ लोकसभा मतदारसंघात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न अजित पवारांचा सुरू आहे. प्रचारात चार पैसे खर्च केले म्हणजे उमेदवार निवडून येऊ शकत नाही. त्यांचा नक्कीच भ्रमनिरास होणार आहे. पवारांच्या नावाचा शहरवासीयांना कंटाळा आला आहे. या निवडणुकीत दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. बारामतीचा दहशतवाद खपवून घेणार नाही. त्यासाठी आज पोलीस प्रशासनाला भेटून याबाबत लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
पिंपरीत महायुतीच्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार अमर साबळे, शिवसेना संपर्कप्रमुख बाळाभाई कदम,आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, सदाशिव खाडे, एकनाथ पवार, उमा खापरे, अमित गोरखे, विलास मडिगेरी, अमोल थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन बापट यांच्या हस्ते करण्यात आले.
गिरीश बापट म्हणाले की, संपूर्ण देशभरात भाजपला चांगले वातावरण आहे. त्या निवडणुकीत केलेली विकास कामे आम्ही लोकांसमोर मांडत आहोत. विरोधकांकडून झालेले आरोप कोर्टाने नाकारले आहेत. निवडणूक आयोगाची माफी मागण्याची वेळ विरोधकांवर आली आहे. २०१४ साली जसे शिवसेना-भाजप महायुतीचे वातावरण होते, त्याचप्रमाणे आता लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या सभांमुळे महायुतीचे चांगले वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीने दिलेल्या उमेदवारासाठी त्यांच्या नेत्यांना तळ ठोकून बसावं लागत आहे. बाहेरचा फापट पसारा आणून लोकांची मते मिळत नाहीत, याचा विसर त्यांना पडला आहे. पुणे जिल्ह्यातील चारही जागा युती जिंकणार असा विश्वास बापट यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मावळ लोकसभा मतदार संघात महायुतीने प्रचारात मुसंडी मारली आहे. लक्ष्मण जगताप आणि बाळा भेगडे यांच्या नेतृत्वात जोरदार प्रचार यंत्रणा सुरू आहे. सत्ता असताना राष्ट्रवादीला विकास करता आला नाही. गेल्या चार-पाच वर्षात आम्ही अनेक विकासाची कामे करून दाखवली. मेट्रोचे काम आज प्रगतीपथावर सुरू आहे. भविष्यात देखील शिवसेना-भाजपा युतीच्या माध्यमातून आम्ही विकास करत राहणार आहोत. राजकीय पटलावर पवार घराण्याचा वावर म्हणजे प्रत्येक शहर त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याप्रमाणे आहे. या लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून त्यांनी आयात उमेदवार दिला. मावळमध्ये बाल हट्ट पुरविला. पुण्यात त्यांना उमेदवारच मिळत नव्हता. याचाच अर्थ नेतृत्वाचा अभाव आणि पवारांचा प्रभाव अशी आता पुणे जिल्ह्याची स्थिती झाली असल्याचा टोला पालकमंत्री गिरीश बापट यांनी लगावला.
कुठल्याही परिस्थितीत आम्ही मावळची जागा जिंकून दाखविणार आहोत. विकास कामांवर निवडणुकीला सामोरे जातोय. पालकमंत्री या नात्याने मी या निवडणुकीकडे पूर्ण लक्ष घातले आहे. या मतदारसंघात आमचे सात ते आठ हजार कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे बारणे नक्की विजयी होतील, असा विश्वास बापट यांनी शेवटी बोलताना केला.





















Join Our Whatsapp Group